इस्रायलच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख रोनन बार बडतर्फ   

जेरूसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी गुप्तचर संस्थेचे प्रमुख रोनन बार यांची पदावरून हकालपट्टी केली. नेत्यान्याहू यांच्या मंत्रिमंडळाने एकमताने या निर्णयाला पाठिंबा दिला. इस्रायलच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने देशांतर्गत सुरक्षा एजन्सीच्या प्रमुखाला बडतर्फ केले आहे.
 
दक्षिण इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर बारवरील आपला विश्वास उडाला असल्याचे नेत्यान्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले. यापूर्वी सरकारने रोनन बार यांच्या बडतर्फीची तारीख २० एप्रिल निश्चित केली होती, जी नंतर बदलण्यात आली. रोनन यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली.   गुप्तचर संस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी रोनन योग्य व्यक्ती नाही, असे नेत्यान्याहू  यांनी सांगितले. त्यानंतर रोनेन बार यांचा कार्यकाळ संपुष्टात आणण्याच्या  नेत्यान्याहू यांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने एकमताने मंजुरी दिली. उत्तराधिकारी नियुक्त झाल्यावर किंवा १० एप्रिलपर्यंत रोनन आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे नेत्यान्याहू यांनी सांगितले. 
 
दरम्यान, पुढील वर्षी बार यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये मागील इस्रायली सरकारने त्यांची गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. ऑक्टोबरमध्ये गाझामध्ये युद्ध पेटवणार्‍या हमासच्या अभूतपूर्व हल्ल्यापूर्वीही नेत्यान्याहू यांच्याशी त्यांचे संबंध ताणले गेले होते, विशेषत: प्रस्तावित न्यायालयीन सुधारणांमुळे देशाचे विभाजन झाले होते.

Related Articles